डाव्या हाताने दिली आयुष्याला कलाटणी!
पुणे - सहावीत असताना शाळेत लिफ्टमध्ये अडकून त्याचा उजवा हात गेला... आयुष्यभर चिकटलेल्या या वेदनेला कुरवाळण्यापेक्षा तिला कवटाळून त्याने झेप घेतली आणि चमत्कार घडला. दहावी आणि बारावीच काय?... तो "आयआयटी'पर्यंत गेला; तेही दोन्ही हातांची गरज असणारा संगणकशास्त्र विषय घेऊन. तिथेच तो थांबला नाही... अमेरिकेत त्याने संगणकशास्त्रातच "मास्टर इन सायन्स' ही पदव्युत्तर पदवी तर मिळविलीच; पण तेथील "लिंकडिन' या नेटवर्किंग कंपनीत नोकरीही मिळवली. जिद्द असेल तर आकाश कवेत घेता येते, हे सिद्ध करून दाखवले. या जिद्दीचे नाव नमित कटारिया!..
पुण्यातील अप्पा बळवंत चौकात राहणाऱ्या नमितच्या यशाला "सकाळ इंडिया फाउंडेशन'मुळे पाठबळ मिळाले. परदेशी शिक्षण घेण्यास जाण्यासाठी त्याला फाउंडेशनने बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली. त्याने आज ती परत केली. "सकाळ'च्या या मदतीची परतफेड म्हणून त्याने पाच हजार रुपयांची देणगीही दिली. त्याचे अनुभव आणि अपंगात्वावर केलेली मात यावर तो बोलला. प्रत्येक वाक्यात सकारात्मकता होती अन् कोणत्याही आव्हानाला भिडण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास होता; दु:खाला कुरवाळणाऱ्या अन् हताश झालेल्या धडधाकट माणसांना उत्साह आणि ऊर्जा देणारा!
पंचविशीतला नमित म्हणतो, 'आयुष्यात जे कधीच बदलता येणार नाही, ते मान्य केलं होतं. त्यामुळं अपंगत्वाचा विचार कधी केला नाही. एक हात नसल्याची सवय झाली होती. मुंबईत असताना एकटा राहिलो; पण कोणतीही अडचण आली नाही. अपघातानं अपंगत्व आलं याचं दु:ख वाटतं. पण त्यामुळे अडचणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला, सकारात्मकता आली. जिद्दीनं काही मिळविण्याची वृत्ती बनली. याचं श्रेय माझ्या कुटुंबीयांना आहे. माझ्या जिद्दीपेक्षा आई-वडील आणि मोठ्या भावाच्या जिद्दीची उंची खूप मोठी आहे. त्यांनी हार मानली नाही. भावानं खूप मदत केली. अभ्यासात त्याला जमलं नाही, ते त्यानं माझ्याकडून करून घेतलं.''
'ज्या माणसांकडे दोन हात आहेत, धडधाकट शरीर आहे, ती माणसं छोटी छोटी दु:खं घेऊन रडत बसतात. पण अपंग माणसांपेक्षा आपल्याला कमीच अडचणीत आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं. अनेक तरुण माझ्याकडून हे होणारच नाही, असा विचार करतात. पण यशासाठी कष्ट करावेच लागतात. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत राहिलं आणि झटत राहिलं, तर ती मिळतेच. पण अपयश आलं तरी त्यातून मिळणारा अनुभव खूप मदत करतो,'' असा आशावाद त्याने व्यक्त केला.
'सकाळ'ने धैर्य दिले!
नमित कटारिया याने "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले आणि "सकाळ इंडिया फाउंडेशन'चे कार्यकारी सचिव डॉ. अरुणकुमार कालगावकर यांच्याकडे कर्जाऊ शिष्यवृत्तीची रक्कम आणि देणगीचा धनादेश दिला. "सकाळ' आणि "सकाळ इंडिया फाउंडेशन'च्या मदतीमुळे दोन वर्षांपूर्वी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे धैर्य मिळाले, अशी भावना नमितने व्यक्त केली. "लिंकडिन' या कंपनीत तीन महिन्यांसाठी इंटर्नशिप केली. हा कालावधी संपला आणि शेवटच्या दिवशी कंपनीने मला नोकरीची ऑफर दिली, असेही त्याने सांगितले. डॉ. कालगावकर म्हणाले, ""शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी दिली जाते, त्यानंतर ती परत करायची असते. नमितने मात्र ती दीड वर्षातच परत केली.''

No comments:
Post a Comment